(फलटण/ प्रतिनिधी) झारखंड राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. काल मध्यरात्री एकच्या सुमारास दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्यपालांच्या बदल्या आणि निुयक्तीबद्दल एक परिपत्रक जारी करण्यात आले. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी विविध राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. शनिवारी मध्यरात्री उशिरा राष्ट्रपती भवनाकडून याबद्दलचे परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकात नवीन राज्यपालांची नावे जाहीर करण्यात आली. यानुसार सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. राधाकृष्णन हे रमेश बैस यांच्या जागी पदभार स्विकारणार आहेत. सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत. तर झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी संतोषकुमार गंगवार यांच्याकडे सोपविण्यात येईल. त्यासोबतच भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील नवनियुक्त राज्यपालांची संपूर्ण यादी
सी. पी. राधाकृष्णन – महाराष्ट्र
हरिभाऊ किसनराव बागडे – राजस्थान
संतोषकुमार गंगवार – झारखंड
रामेन डेका – छत्तीसगड
सी. एच. विजयशंकर – मेघालय
ओमप्रकाश माथूर – सिक्किम
गुलाबचंद कटारिया – पंजाब, चंडीगड
लक्ष्मण प्रसाद आचार्य – आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार)
जिष्णू देव वर्मा – तेलंगणा
सी. पी. राधाकृष्णन यांचा अल्पपरिचय
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूचे ज्येष्ठ भाजप नेते आणि झारखंडचे माजी राज्यपाल आहेत. त्यांचा जन्म 4 मे 1957 रोजी तिरुपूरमध्ये झाला. वयाच्या 16 व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच जनसंघासाठी कार्य सुरु केले. ते कोईम्बतूरमधून दोन वेळा निवडून लोकसभेवर गेले होते. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 2004 ते 2007 या काळात त्यांच्याकडे तामिळनाडूची सूत्र होती. या कालावधीत त्यांनी रथयात्रा काढली होती. त्यासोबतच नदीजोड प्रकल्प, अस्पृश्यता आणि दहशतवादाला विरोध यासाठीही त्यांनी आवाज उठवला होता. ते 2016 ते 2019 पर्यंत ऑल इंडिया कॉयर बोर्डाचे अध्यक्ष होते.
सी पी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. तामिळनाडू आणि केरळसह इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गेल्या कित्येक वर्षांपासून ते आरएसएस, जनसंघ आणि भाजप यांच्याशी संबंधित आहेत.
पाच वर्षांतील तिसरे राज्यपाल
दरम्यान महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यातच आता राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल आहेत. रमेश बैस यांची गेल्या वर्षी 18 फेब्रुवारी रोजी नियुक्ती झाली होती. त्याआधी भगतसिंह कोश्यारी यांनी 5 सप्टेंबर 2019 ते 17 फेब्रुवारी 2023 असे साडे तीन वर्ष महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषवले. त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल आहेत.