गोखळी( प्रतिनिधी) मी पणाचा त्याग करून आम्हीचा स्वीकार करणारेच वारीचे वारकरी होत.सर्वांनी एकमेकाविषयी आदर आपुलकी मान सन्मान करून जीवनाचा अविस्मरणीय अनुभव अनुभवणे म्हणजे पंढरीची वारी होय. उत्तम प्रंपच करून दैनंदिन कर्तव्य पार पाडून परामार्थ करणे हे विठ्ठलाला आवडते. जन्म मरणाची वारी आपल्या कर्माने घडते. घरात एकोपा शांती समाधान ठेवल्यास भगवंताची सेवा घडते असे प्रतिपादन कथाकार प्रबोधनकार प्रा रवींद्र कोकरे यांनी केले.
श्री खंडेश्वरी भजनी मंडळ खांडज( बारामती) यांनी वारीचे वारकरी या प्रबोधनात्मक व्याख्यानांचे आयोजन केले होते. वक्ते प्रा रवींद्र कोकरे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
गोपाळकाला, दिंडी सोहळा, भजन, फुगडी, महाप्रसादाचे या निमित्ताने ग्रामस्थांनी भव्य दिव्य आयोजन केले होते.
रामाचा आचार, कृष्णाचा विचार, हरिचा उच्चार हाच खरा मंत्र होय. कर्म चांगले करून माणुसकी जपणे. सामाजिक जाणिवांचे भान ठेवून दुसऱ्यास मदत करणे हाच खरा वारकरी संप्रदाय आहे. असे विचार कोकरे यांनी साध्या सोप्या रसाळ भाषेत मांडून भाविकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ताराचंद आगवणे यांनी केले. आभार प्रदर्शन विष्णू सोरटे यांनी केले. तानाजी जाधव, पोपट आटोळे, विजय गुजले, संतोष मोहिते, आप्पा आटोळे, द्रौपदा जाधव, भामाबाई आटोळे, वैशाली कदम, अंजना आटोळे या भाविक भक्तांसह ग्रामस्थांनी उत्तम नियोजन केले. बालगोपळ व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.