हि बातमी ईतर भाषेत वाचा
महाराष्ट्र

प्रेम व भक्ती सांप्रदायाचा पाया संत नामदेवांनी रचला : राज्यपाल बनवारीलाल पुरोहित

श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब )/फलटण दि. प्रतिनीधी – उत्तर भारतात भागवत धर्माचे प्रचारक म्हणून संत नामदेव महाराजांचे कार्य श्रेष्ठ आहे . पंजाब व महाराष्ट्र हे दोन प्रांत अध्यात्मिक दृष्ट्या जोडण्या बरोबरच प्रेम व भक्ती सांप्रदायाचा पाया संत नामदेवांनी रचला . अशा संतांच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो असे भवोद्गार पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केले .

पालखी सोहळा पत्रकार संघ , भागवत धर्म प्रसारक मंडळ , महाराष्ट्र राज्य व श्री नामदेव दरबार कमेटी श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) यांनी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण या सुमारे २५०० किलोमिटरच्या रथ व सायकल यात्रेच्या निमित्ताने संत शिरोमणी श्री नामदेव यात्री निवास साठी पंजाबचे राज्यपाल मा श्री बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे वीस रुम व एक मोठे सभागृह बांधकामासाठी दोन कोटी रुपये निधीची मागणी केली होती . त्यापैकी एक कोटी रुपये निधी पंजाब राज्यपाल कार्यालयाने मंजुर केला आहे तर उर्वरीत एक कोटी निधी महाराष्ट्र शासनाने द्यावा असे राज्यपाल पुरोहित म्हणाले . याबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलतो असेही ते म्हणाले .

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे २० वर्षे वास्तव्य असलेल्या पंजाब प्रांतातील श्री क्षेत्र घुमाण येथे एक कोटी रुपये खर्चाच्या श्री संत नामदेव यात्री निवास इमारतीचा भूमिपूजन समारंभ पंजाबचे महामहीम राज्यपाल मा श्री बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते मंगळवार दि . २३ जुलै २०२४ रोजी दुपारी २ वाजता संपन्न झाला . त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते .

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना अध्यात्मा विषयी निरंतर श्रध्दा व विश्वास आहे . आषाढी वारी करणा-या राज्यातील सुमारे १५०० दिंड्यांना त्यांनी प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान दिले आहे . महाराष्ट्रातुन भागवत धर्माची पताका उत्तर भारतात घेवुन जाउन संतांची विश्वकल्याणाची संकल्पना पुर्ण करणा-या संत नामदेवांचे श्री क्षेत्र घुमाण येथील पवित्र स्थान पाहून मन भारावुन गेले . या स्थानाचे माहात्म्य लक्षात घेवुन पंजाब गव्हर्नर यांनी जे काम केले आहे ते अद्वितीय आहे . या कामात महाराष्ट्र सरकारही निश्चित मदत करेल . पंजाब व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना भक्ती व शक्तीची मोठी परंपरा आहे . या कार्यक्रमाने या दोन्ही राज्यातील स्नेह संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी व्यक्त केला .

या भूमिपुजन समारंभास पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे , उपाध्यक्ष सुभाष भांबुरे , श्री नामदेव दरबार कमेटीचे अध्यक्ष बाबा हरजिंदर सिंह , प्रमुख बाबा तरसेम सिंह , सचिव बाबा सुखजिंदर सिंह , उप सचिव बाबा मनजिंदर सिंह , बाबा सरबजित सिंह , सरपंच बाबा नरेंद्र सिंह , उपाध्यक्ष बाबा रघुवीर सिंह , नासपचे सचिव डॉ अजय फुटाणे , बाळासाहेब आंबेकर , रामभाउ बगाडे , गणबावले यांच्यासह मोठ्या प्रमाणात नामदेव भक्त उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!